हक्काचा कान
इंटरनेट हे व्यक्त होण्याचं माध्यम आहे यावर माझा खरं तर विश्वास नाही , असं सगळ्यांसमोर सगळं व्यक्त होणं मनाला पटत नाही. मला तशी गरजही कधी लागली नाही. पण माणसाच्या मनात गोष्टी साठत गेल्या कि त्याला रिकामी झाल्यासारखं वाटू लागतं अन् ही रिकामीपणाची भावना फार वाईट असते. आपला श्वास जरी थांबत नसला तरी ही भावना मन मारून टाकते. आता मन गुंतवायला हजारो गोष्टी असतात खऱ्या, पण प्रत्येकाला ना आपलं ऐकून घेणारा एक कान हवासा वाटतो. त्याने काही समजवावं , उत्तर द्यावं ह्या गोष्टी दुय्यम असतात पण विश्वासाने आपण जसं आहोत तसं आपल्याला ऐकावं असं कोणीतरी प्रत्येकाला हवं असतं. बऱ्याचदा ऐकणाऱ्याचा संबंध नसला तरी त्याने सगळं ऐकावं असं वाटत राहतं. इथे आपण परके नसू,सांगितलेलं जणू आपल्यालाच सांगतोय असा विश्वास असतो.
मला आवडतं लोकांचं असं ऐकायला, तो विश्वास पाहायला छान वाटतं. अर्थात बऱ्याचदा मी तत्वज्ञान देतोच आणि तसा मी वायफळ बडबड करण्यात पटाईत असलो तरी पण माझं सगळं सगळ्यांना ऐकवावं असं फार कधी वाटतं नाही. पण या ऐकण्यात वेगळीच मजा असते. आता असे कान आपल्याला भेटत नाहीत असं नाही,फक्त ते टिकवणं कठीण असतं. प्रत्येक माणसाला गरज असते व्यक्त होण्याची,मनात गोष्टी साठू न देण्याची. मन हलकं होतं वैगेरे म्हणणार नाही पण याने वजन नक्कीच कमी होतं.
आपल्याला नेहमी लोकांना ऐकवत राहायला आवडत असतं, माणसाचा गुणच तो. पण कधी तरी निवांत वेळी शांत व्हावं, समोरच्याच ऐकून घ्यावं,ऐकल्याने नवं समजतं, माणूस उलगडतो आणि तेव्हा त्याच्या डोळ्यातला तो विश्वास बरंच काही देऊन जातो.
Comments
Post a Comment